Maval Politics: मावळात भाजपची मोठी फिल्डिंग! आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात ‘हा’ नेता मैदानात उतरणार?
Maval Politics: गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीने राजकीय वातावरण तापले; महिला आघाडीच्या माध्यमातून भाजपचा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न.

– चेतन वाघमारे
Maval Politics – मावळ तालुक्यात आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. विविध भागांत पदग्रहण सोहळे, कार्यकर्ता मेळावे आणि महिला आघाडीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे मावळ भाजपच्या आगामी राजकीय रणनीतीबाबत चर्चेला उधाण आले आहे.
इंदोरी येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या पदग्रहण सोहळ्याला पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची राजकीय चर्चा रंगली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थितीही यावेळी पाहायला मिळाली. यापूर्वी भाजप महिला आघाडीच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पक्षाने मावळात संघटनात्मक हालचाली वाढवल्याचे स्पष्ट होत आहे.
मावळ भाजपकडून लोणावळा, देहू, तळेगाव, इंदोरी, टाकवे यांसह तालुक्यातील विविध भागांत कार्यकर्ता संकल्प मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याबरोबरच बूथपातळीवरील संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक कोणतीही असो, त्यासाठी बूथपातळीवरील संघटन महत्त्वाचे मानले जाते.
त्यामुळे भाजपकडून सध्या सुरू असलेल्या बैठकांना आणि मेळाव्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भाजपकडून सुरू असलेले कार्यकर्ता मेळावे आणि पदग्रहण कार्यक्रम ही नियमित संघटनात्मक प्रक्रिया असल्याचे पक्षाकडून सांगितले जाऊ शकते.
मात्र आगामी राजकीय परिस्थिती लक्षात घेता या कार्यक्रमांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. कार्यकर्ता मेळाव्यांमधून स्थानिक प्रश्न, संघटनात्मक अडचणी आणि मतदारांशी असलेला संपर्क यांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची रणनीती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
आमदारांसमोर भाजपचा कोणता चेहरा?
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासमोर आगामी काळात भाजपकडून कोणता चेहरा मैदानात उतरविला जाणार, हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पुन्हा संधी दिली जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र पक्षाकडून उमेदवारीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत.
त्यामुळे बाळा भेगडे यांच्यासह पक्षातील इतर संभाव्य चेहऱ्यांचीही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मावळ भाजपमध्ये गेल्या काही काळात नेतृत्व आणि संघटनात्मक पातळीवर विविध घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत समीकरणे कोणत्या दिशेने जातात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.






