Maval News: पवना धरणग्रस्त आरपारच्या लढाईवर ठाम! आमदारांशी चर्चा निष्फळ; आज होणाार मोठं आंदोलन?
Maval News: आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच; पुनर्वसन आणि बंदिस्त जलवाहिनीच्या प्रश्नावर धरणग्रस्त आक्रमक.

Maval News- पवना धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंगळवारी (दि. २९) पवना धरण परिसरात धरणग्रस्त आणि आमदार सुनील शेळके यांची बैठक झाली. या बैठकीस धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र चर्चेनंतरही मागण्यांवर अंतिम तोडगा निघाला नसल्याने २ ऑक्टोबर रोजी नियोजित आंदोलनाची भूमिका धरणग्रस्तांनी कायम ठेवली आहे.
बैठकीत धरणग्रस्तांनी पुनर्वसन, जमिनीचे वाटप तसेच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत आपली भूमिका मांडली. शासनाकडे या मागण्या सातत्याने मांडण्यात आल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. तर काही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय झाल्याचेही त्यांनी नमूद केले. पुनर्वसनाच्या प्रश्नावर बोलताना शेळके यांनी २०२३ मधील शासन निर्णयाचा तसेच संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचा उल्लेख केला.
न्यायालयीन स्थगिती उठविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा आणि पवना बंदिस्त जलवाहिनीच्या प्रश्नावरही ठोस निर्णय व्हावा, अशी धरणग्रस्तांची मागणी आहे. या मागण्यांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने आज (दि. २) आंदोलन करण्याची भूमिका कायम असल्याचे धरणग्रस्तांनी स्पष्ट केले. आंदोलनात सहभागी होणार का, या प्रश्नावर आमदार सुनील शेळके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हे आंदोलन शेतकऱ्यांच्या नेतृत्वात होत असते तर मी शंभर टक्के आलो असतो. मात्र बाहेरचा नेता या आंदोलनाचे नेतृत्व करणार असेल तर आम्ही त्या आंदोलनात सहभागी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत चर्चा होऊनही धरणग्रस्तांच्या मागण्यांवर अंतिम तोडगा निघाला नसल्याने आता २ ऑक्टोबरच्या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे. शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय राहते, याकडे मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.




