Maval News: स्मशानभूमीच नसल्याने मृतदेह रात्रभर घरात; धरणग्रस्तांचा जोवण-तिकोणा मार्गावर रास्ता रोको
Maval News: गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीत मूलभूत सुविधांचा अभाव; गीताबाई बोडके यांच्या पार्थिवावर वेळेवर अंत्यसंस्कार न झाल्याने नागरिकांचा संताप.

Maval News – पवना धरणासाठी आपली घरे, शेती आणि उपजीविका गमावून पुनर्वसन स्वीकारलेल्या गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीतील धरणग्रस्तांवर अत्यंत वेदनादायी प्रसंग ओढवला आहे. पुनर्वसनानंतरही स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध न झाल्याने गुरुवारी (दि. ३०) निधन झालेल्या गीताबाई बोडके यांच्या पार्थिवावर वेळेवर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मृतदेह रात्रभर घरातच ठेवावा लागला.
या घटनेमुळे धरणग्रस्तांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून शासनाच्या पुनर्वसन धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी जोवण-तिकोणा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पवना धरण उभारणीसाठी हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यावेळी पुनर्वसित गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य सुविधा आणि स्मशानभूमीसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र अनेक वर्षे उलटूनही गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीत स्मशानभूमीची व्यवस्था न झाल्याने धरणग्रस्तांना मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या नवीन नसून अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
“पुनर्वसनानंतरही स्मशानभूमीसाठी आंदोलन करावे लागत असेल, तर हा धरणग्रस्तांवरील मोठा अन्याय आहे. आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे. अन्यथा धरणग्रस्त संयुक्त समितीच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
– नारायण बोडके, अध्यक्ष, धरणग्रस्त संयुक्त समिती





