Maval News: पिकांचे नुकसान, मात्र जिद्द कायम
पावसाच्या अनियमिततेचा फटका; आर्थिक संकटातही नव्या पिकाची तयारी

– अतुल चोपडे पाटील
नाणे मावळ – पावसाच्या अनियमिततेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी भातपिके पाण्याअभावी करपली आहेत. भातलागवडीपासून पिकाच्या संगोपनापर्यंत केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, एका हंगामात नुकसान झाले म्हणून खचून न जाता शेतकरी पुन्हा नव्या पिकाच्या तयारीला लागले आहेत.
नाणे मावळ परिसरातील अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह भातशेतीवर अवलंबून आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रोपवाटिका तयार करणे, भातलागवड, मशागत, खते आणि औषधांची फवारणी यासाठी शेतकरी मेहनत घेतात. यंदाही चांगले उत्पादन मिळेल, या अपेक्षेने त्यांनी भातशेतीवर मोठा खर्च केला होता.
मात्र, पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली. काही ठिकाणी रोपे सुकली, तर काही ठिकाणी उभी भातपिके करपली. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
शेतीचा वाढता खर्च, नैसर्गिक संकटे, पिकांचे नुकसान आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच कोलमडले आहे. त्यात यंदा भातशेतीचे नुकसान झाल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे आणि पुढील हंगामासाठी पैसा उभा करायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, शासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन पात्र शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे नुकसान झाले आणि आर्थिक संकट उभे राहिले. तरीही शेतकऱ्यांची शेती करण्याची जिद्द कमी झालेली नाही. करपलेल्या पिकाकडे पाहताना मनात दुःख असले, तरी नव्या हंगामाच्या आशेने शेतकरी पुन्हा जमिनीच्या मशागतीला लागले आहेत. संकटातून सावरण्याचा आणि नव्याने उभे राहण्याचा नाणे मावळातील बळीराजाचा हा प्रयत्न त्याच्या जिद्दीची साक्ष देत आहे.
दिवाळीही चिंतेतच
सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि रोषणाई सुरू असताना नाणे मावळातील अनेक शेतकरी कुटुंबांची दिवाळी मात्र आर्थिक चिंतेत गेली. भातपिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सणासुदीचा खर्च, घरातील गरजा आणि वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, यंदा पिकाचे नुकसान झाल्याने या नियोजनाला मोठा धक्का बसला. घराघरांत दिवाळीचे दिवे उजळले असले, तरी शेतकऱ्यांच्या मनात करपलेल्या पिकाच्या नुकसानीची चिंता कायम होती. सणाचा आनंद साजरा करतानाही शेतीच्या नुकसानीचे दुःख त्यांना विसरता आले नाही.
नव्या पिकासाठी पुन्हा सज्ज
भातशेतीच्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांनी हार मानलेली नाही. उपलब्ध पाणीसाठा आणि जमिनीची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील पिकाचे नियोजन सुरू केले आहे. शेतातील मशागत, नांगरणी आणि जमिनीची तयारी याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. एका हंगामात नुकसान झाले म्हणून शेती सोडायची नाही, या जिद्दीने बळीराजा पुन्हा शेतात उतरला आहे.





