रायबरेलीसाठी ‘राहुल गांधींची ‘डबल इंजिन एमपी थिअरी’ ; म्हणाले,”प्रियांका अन् मी एकत्र…”

Rahul Gandhi Two MP Remark । देशात कोणत्याही निवडणुका झाल्या तरी एकाच एक शब्द नेहमी ऐकायला मिळतो तो म्हणजे,”डबल इंजिन”. राज्यातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते डबल इंजिन सरकारचा नारा देताना दिसून आले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच सरकारसाठी नाही तर खासदारांसाठी ‘डबल इंजिन’हा शब्द वापरला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘टू एमपी थिअरी’ चा नारा दिला आहे.
“हे काही राजकीय नाते नाही, तर ते कौटुंबिक नाते” Rahul Gandhi Two MP Remark ।
राहुल गांधी त्यांच्या संसदीय मतदारसंघ रायबरेलीमधील उंचाहारमध्ये होते त्यावेळी त्यांनी ही थेअरी सर्वांसमोर मांडली. याठिकाणी एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी, “रायबरेली ही अशी जागा आहे, कदाचित संपूर्ण भारतातील एकमेव मतदारसंघ आहे जिथे दोन खासदार आहेत. एक मी आणि दुसरी प्रियांका. तिला देखील कधी याठिकाणी बोलवावे” असे त्यांनी म्हटले. ती मला वायनाडला बोलावते आणि मी जातो तसेच तिलापण तुम्ही याठिकाणी बोलावावे असे त्यांनी म्हटले.
पुढे त्यांनी, लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी रायबरेलीच्या जनतेचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले. राहुल गांधींनी गांधी कुटुंबाच्या रायबरेलीशी असलेल्या संबंधांचाही उल्लेख केला आणि म्हणाले की,”तुम्हाला काही समस्या असतील, फक्त मला सांगा की काय करायचे आहे आणि मी ते पूर्ण करेन. मी नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध असतो. तसेच आपल्यातली नाते हे काही राजकीय नाते नाही, तर ते कौटुंबिक नाते आहे.” असे म्हणून त्यांनी उपस्थितांना विश्वास दाखवला.
राहुल गांधींच्या थेअरीवर प्रियांकाची प्रतिक्रिया Rahul Gandhi Two MP Remark ।
राहुल गांधींच्या दोन खासदारांच्या सिद्धांतावर प्रियांका गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत,”रायबरेली हे आमचे कुटुंब आहे आणि आम्ही कुटुंबाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करू. ” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रियंका गांधी गेल्या अनेक वर्षांपासून रायबरेलीत सक्रिय आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार होत्या. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत प्रियंका गांधी रायबरेलीत तळ ठोकून सोनिया गांधींच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी घेतली होती.
सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर गेल्यानंतर प्रियांका गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशीही चर्चा होती. मात्र २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली नाही आणि राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघ तसेच रायबरेली येथून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या. राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडली होती आणि प्रियंका गांधी पोटनिवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.





