गणित, विज्ञान उत्तीर्णचे निकष ‘जैसे थे’; इयत्ता दहावीच्या परीक्षेबाबत राज्य मंडळाचे स्पष्टीकरण

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्ण होण्याचे निकष जैसे थे ठेवण्यात आले आहेत. ज्यावर्षी या निकषात बदल होतील, त्या वेळी मंडळामार्फत स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी घ्यावी, अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेत गणित व विज्ञान विषयांची परीक्षा आवश्यक गुणांसह उत्तीर्ण होण्याचे दडपण अनेक विद्यार्थ्यांना असते. त्या पार्श्वभूमीवर या विषयांत उत्तीर्ण होण्यासाठी गुणमर्यादा ३५ वरून २० करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. गणित आणि विज्ञान या विषयांसाठी उत्तीर्णतेचे निकष मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच असणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.
याबाबत राज्य अभ्यासक्रमात तरतूद करण्यात आली असून, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने त्याला मान्यता दिली आहे. मात्र, यंदाच्या परीक्षेत त्यानुसार कोणत्याही बदल करण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहेत.





