Matheran News | बँक आली, पण टिकली नाही ; माथेरानमधून आरडीसी बँकची शाखा बंद होणार

प्रभात वृत्तसेवा
माथेरान – पर्यटकांचे आवडते ठिकाण आणि डोंगरराईच्या कुशीत वसलेल्या माथेरान शहरासमोर पुन्हा एकदा बँकिंग सेवांचा प्रश्न उपस्थित होणार आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी (आरडीसी) बँकेची माथेरान शाखा नेरळला हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे.
माथेरानमध्ये युनियन बॅंकेव्यतरिक्त कोणत्याही सहकारी बँकेची शाखा नव्हती.
शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष शफिक बडाने, रमाकांत तोरणे, उमेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे आणि शेकाप नेते जयंत पाटील यांच्या पुढाकाराने १० ऑक्टोबर २०२३ रोजी आरडीसी बँकेची शाखा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अनेक खाती उघडली गेली, ठेवी वाढल्या आणि एफडीसाठीही गती मिळाली होती. मात्र काही महिन्यांतच व्यवहार घटू लागले.
अपेक्षित ठेवी जमा न झाल्याने आणि वार्षिक उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य न झाल्याने शाखा तोट्यात जाऊ लागली.शाखा सुरू ठेवण्यासाठी लागणारे महागडे भाडे, कर्मचारी वेतन आणि इतर खर्च यांचा ताळमेळ न बसल्याने अखेर बँकेला शाखा नेरळला हलवावी लागली. आता २० सप्टेंबर २०२५ पर्यंत माथेरान शाखेत व्यवहार सुरू राहणार असून १ ऑक्टोबरपासून सर्व सेवा नेरळ शाखेतूनच दिल्या जाणार आहेत.
योजनेअभावी नागरिकांचे दुर्लक्ष..
माथेरानच्या लोकांना बँकेकडून कर्ज सुविधा, एटीएम सेवा आणि तातडीच्या बँकिंग सोयी अपेक्षित होत्या. मात्र त्या सुविधा उपलब्ध न झाल्याने ग्राहक निराश झाले. शिवाय स्थानिक लोकसंख्येवर आधारित वार्षिक उत्पन्न सहकारी बँकांच्या निकषांपर्यंत पोहोचले नाही.
नेटवर्कचा मोठा अडथळा..
डोंगराळ भौगोलिक परिसर बँकिंग सेवांसाठी मोठा अडथळा ठरतो. या भागात मोबाईल नेटवर्क वारंवार खंडित होते. त्यामुळे युनियन बँकेचे सर्व्हरही नीट चालत नाही. व्यवहार करताना मोठ्या रांगा लागणे, ठेवी व पैसे काढण्यास विलंब होणे ही सामान्य बाब झाली होती. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिक अजून एका बँकेची शाखा असावी, अशी मागणी सातत्याने करीत होते. मात्र आता आरडीसी बँकेची शाखा हलवल्यानंतर नागरिक व पर्यटकांच्या मूलभूत सोयीसुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“युनियन बँकेच्या समस्यांमुळे नागरिक व पर्यटकांना त्रास होतो. आरडीसी बॅंकेची शाखा तरी दिलासा देईल अशी आशा होती. पण शाखा टिकण्यासाठी बँकेने कर्ज व एटीएम सुविधा देणे आवश्यक होते. दुसरीकडे नागरिकांनी पुरेशा खात्यांद्वारे व व्यवहारांद्वारे बँकेला आधार दिला नाही, ही आपलीच उणीव ठरली.”
– ज्ञानेश्वर बागडे, व्यावसायिक



