प्रभात वृत्तसेवा माथेरान – कर्जत माथेरान मिनी बस सेवा गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. कधी बसचा बिघाड, कधी बसथांब्यांवरून होणारे वाद, तर कधी चालक–कंडक्टर यांच्यावर दबाव अशा घटनांमुळे प्रवाशांचे हाल काही केल्या कमी होत नव्हते, चालक वाहक यांच्याशी विनाकारण वाद घालणे आणि मारहाणीची भीती दाखवणे या प्रकारांनी परिस्थिती चिघळली होती. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय घेण्याऐवजी कर्जत आगार प्रशासनाने उलट महामार्गावरच बस थांबवून प्रवाशांना चढ उतर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांना उन्हात, पावसात उभे राहून जवळपास एक किलोमीटर चालत नेरळ स्टेशन गाठावे लागत होते. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय प्रचंड वाढली होती.याच कारणासाठी माथेरान समितीच्या शिष्टमंडळातील चंद्रकांत जाधव, कुलदीप जाधव, प्रदीप घावरे, गिरीश पवार, राजेश चौधरी, दिनेश सुतार आणि मुकुंद रांजाणे यांनी कर्जत आगारप्रमुखांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बस थांबा बदलण्याचा निर्णय आम्ही सहन करणार नाही. जर वाहक आणि चालकांशी वाद होत असेल तर पोलीस प्रशासनाला सोबत घ्या. प्रवाशांना योग्य सुविधा देणे ही एसटी प्रशासनाची जबाबदारी आहे, प्रवाशांना वेठीस धरणे नव्हे.समितीच्या ठाम भूमिकेमुळे अखेर देवानंद मोरे यांनी हा निर्णय मागे घेतला. तसेच पोलीस प्रशासनालाही परिस्थितीची माहिती देण्याचे आश्वासन दिले.मात्र प्रवाशांचा प्रश्न तात्पुरता न राहता कायमस्वरूपी सोडवला गेला पाहिजे. अतिक्रमण हटवणे, वाहतूक व्यवस्थापन करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त करणे हा खरा तोडगा असल्याचे समितीने स्पष्ट केले.