प्रभात वृत्तसेवा माथेरान – माथेरान नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार सुनील तटकरे यांच्या एकाच दिवशी झालेल्या प्रभावी सभांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मतदारांपर्यंत पोहोचवली जाणारी आश्वासने, स्थानिक मुद्द्यांवरील चर्चा आणि प्रलंबित समस्यांवर उपाययोजना यामुळे संपूर्ण माथेरान राजकीय रंगात रंगून गेले आहे. माथेरानमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या ई-रिक्षा व अश्वचालकांच्या चर्चेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभेत मोठी घोषणा करताना सांगितले की सुप्रीम कोर्टाने ई-रिक्षांबाबत दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे. ई-रिक्षा सरकारच खरेदी करून सेवा वाढवणार आहे. घोडेवाल्यांच्या रोजगारावर कसलाही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. शिवराष्ट्र पॅनलच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी ई-रिक्षांच्या फायद्यांवर भर देत काही मुद्दे मांडले, त्यात ई-रिक्षांमुळे पर्यटकांची पायपीट कमी झाली असल्याचे ते म्हणाले. वाहतूक व्यवस्था सुधारल्याने पर्यटनवाढ होण्यास हातभार लागला असून ई-रिक्षा पॉईंटवर जात नसल्याने अश्वचालकांचा व्यवसाय कमी न होता उलट वाढणार असल्याचेही ते म्हणाले. घोडेवाल्यांच्या नाराजीला दूर करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून आश्वासने दिली जात असली तरी, घोडेवाल्यांमध्ये दर निवडणुकीला आम्ही आठवतो पण नंतर विसरले जातो, अशी तीव्र भावना दिसत आहे. ४० वर्षांचा तबेल्यांचा प्रश्न कायम माथेरानमध्ये एकही नवीन तबेला मागील चार दशकांत बांधला गेलेला नाही. त्यामुळे घोड्यांच्या देखभालीसाठी योग्य जागेचा अभाव असूनही तबेल्यांचे प्रश्न केवळ सभांत चर्चिले जातात. वर्षानुवर्षे आश्वासने मिळतात पण प्रत्यक्षात एकही निर्णय होत नसल्याची भावना घोडेवाल्यांच्या मनात आहे. निवडणुकीत ई-रिक्षांसोबतच घोडेवाल्यांचा आर्थिक भविष्याचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. फक्त ९ रिक्षांवर संपूर्ण शहर अवलंबून सध्या माथेरानमध्ये ई-रिक्षांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सुप्रीम कोर्टाने २० ई-रिक्षांना मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र फक्त ७-८ रिक्षाच रस्त्यावर दिसत आहेत. तीन शाळांसाठी १५ रिक्षा गुंतलेल्या आहेत तर चार-पाच रिक्षा दुरुस्तीसाठी अडकलेल्या असतात. यामुळे पर्यटकांपासून स्थानिकांपर्यंत सर्वांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सात रिक्षा निवडणुकांसाठी राखीव निवडणूक कामांसाठी प्रशासनाने सात ई-रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे शहरातील आधीच कमी असलेली रिक्षा सेवा अधिकच बाधित झाली आहे. माथेरानमध्ये ८०० हून अधिक बाहेरगावी राहणारे मतदार मतदानासाठी परतणार आहेत. सोबतच शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्याच प्रमाणे पर्यटकांचा ताण देखिल वाढत आहे. या परिस्थितीत लोकांच्या मूलभूत गरजा निवडणूक प्रक्रियेपेक्षा दुय्यम ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.