पिंपरी | रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची जुळवाजुळव

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – परतीच्या पावसाचा जोर कमी होताच मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वीच्या मशागती व पेरणीचे वेध लागले असून रब्बी गहू, हरभरा, ज्वारी, मसूर पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू केली आहे.
मावळ तालुका हा प्राधान्याने खरीप पिकाचा तालुका असून रब्बीचे क्षेत्र हे तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात आहे. तळेगाव दाभाडे, इंदुरी, सुदुंबरे, सुदवडी, नवलाख उंबरे, नानोली, वराळे, माळवाडी,
कोटेश्वरवाडी, कुंडमळा,आंबी, वारंगवाडी, वडगाव, उर्से, परंदवडी, सोमाटणे, धामणे, शिरगाव, गोडुंबरे, साळुंबरे, गहुंजे, दारुंबरे, सांगावडे आदी गावांमध्ये रब्बीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
मावळ तालुक्यात यावर्षी शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला असल्यामुळे तालुक्यातील सर्व धरणे, नदी, नाले, ओढे, तलावावरील बंधारे, विहिरी पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. या पाण्याचा उपयोग रब्बी पिकांसाठी शेतकरी करीत असतात.
मान्सूनचा परतीचा पाऊस लांबला असल्याने रब्बी पिकाच्या पेरण्याही लांबणीवर पडलेल्या आहेत. परंतु आता पाऊस उघडल्यामुळे रब्बी पिकाच्या पूर्वमशागती आणि पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू झालेली आहे.
२३ गावांमध्ये रब्बीचे ५ हजार हेक्टर क्षेत्र
मावळ तालुक्यात एकूण पाच हजार हेक्टर क्षेत्रावर गहू, ज्वारी, हरभरा, मसूर ही पिके घेतली जातात. त्यासाठी शेतकरी मशागतीच्या व पेरणीच्या कामाला लागले आहेत.
मावळ तालुक्यात १७१ गावे जरी खरीप पिकाखाली येत असली तरी तालुक्यातील २३ गावांमध्ये रब्बीचे क्षेत्र सुमारे पाच हजार हेक्टर आहे.
परतीचा पाऊस उघडल्यावर या ठिकाणी रब्बी पिकाच्या पेरण्या केल्या जातात. त्यासाठी शेतकऱ्यांकडून बी बियाणे, रासायनिक खते यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.





