Water Wastage: महात्मा फुले नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी!
Water Wastage: नागरिकांना पाणी बचतीचे धडे देणाऱ्या महापालिकेला स्वतःच्या जलवाहिनीतील गळती रोखण्यासाठी आणखी किती वेळ घेणार?

चिखली – एकीकडे पाणी बचतीचे आवाहन, तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी रस्त्यावर! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कृष्णानगर प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत महात्मा फुले नगरच्या प्रवेशद्वाराजवळ, हॉटेल शिवशंकर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. एकाच ठिकाणी वारंवार गळती होत असल्याने महापालिकेच्या जलवाहिनी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, मुख्य जलवाहिनीतून पाणी रस्त्यावर वाहत असताना ही गळती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पाण्याची टंचाई आणि वाढती मागणी लक्षात घेता, अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणे ही गंभीर बाब आहे. तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी कायमस्वरूपी उपाय हवा, या गळतीबाबत संबंधित अधिकारी गुजर यांना सांगितले आहे.
यापूर्वीही याच ठिकाणी अनेकदा गळती झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केवळ वरवरची दुरुस्ती करून प्रश्न मिटवण्याऐवजी जलवाहिनीची तांत्रिक तपासणी करावी, गळतीचे मूळ कारण शोधावे आणि आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी केली आहे.
नागरिकांना पाणी बचतीचे धडे देणाऱ्या महापालिकेला स्वतःच्या जलवाहिनीतील गळती रोखण्यासाठी आणखी किती काळ घेणार, पाण्याची नासाडी थांबवून कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, या बाबतीत प्रत्यक्ष कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचे आव्हान नागरिकांनी केले आहे.
Satara: सातार्यात पाणीटंचाईचा भडका; पश्चिम भागात दोन दिवस पाणीबंदी फटका





