Satara: सातार्यात पाणीटंचाईचा भडका; पश्चिम भागात दोन दिवस पाणीबंदी फटका
Satara पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने टँकरच्या मागणीत सुमारे 20 टक्के वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, टँकरवर अवलंबून राहावे लागल्यास घरगुती खर्चातही भर पडण्याची शक्यता आहे. विशेषतः आर्थिकदृष्टया सामान्य कुटुंबांना पाण्यासाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो.

Satara: शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच आता कासच्या नवीन जलवाहिनीच्या जोडणीसाठी दोन दिवसांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने सोसाव्या लागणार आहेत. मंगळवार, दि. 27 आणि बुधवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी सांबरवाडी येथील फिल्टरेशन प्लांटमध्ये नवीन जिल्हा जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार असल्याने या काळात पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. आधीच अपुर्या दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी असताना, दोन दिवसांच्या पाणीबंदीमुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.
शहराच्या पश्चिम भागातील पॉवर हाऊस टाकी, गणेश टाकी, कात्रेवाडा टाकी आणि दस्तगीर कॉलनी येथील टाक्यांना या शटडाऊनचा फटका बसणार आहे. परिणामी, या टाक्यांवर अवलंबून असलेल्या परिसरातील नागरिकांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक, कपडे धुणे आणि दैनंदिन स्वच्छतेसाठी आवश्यक पाण्याची साठवण करण्याची धावपळ नागरिकांना करावी लागणार आहे.
काही भागांत अवघ्या 15 मिनिटे पाणी!
शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या केवळ दोन दिवसांच्या शटडाऊनपुरती मर्यादित राहिलेली नाही. शनिवार पेठ, करंजे, केसरकर पेठ या भागांत अवघ्या 15 मिनिटे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि अपुरा वेळ यामुळे अनेक कुटुंबांना रोजच्या गरजा भागविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
टँकरवरील अवलंबित्व वाढण्याची शक्यता
पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने टँकरच्या मागणीत सुमारे 20 टक्के वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, टँकरवर अवलंबून राहावे लागल्यास घरगुती खर्चातही भर पडण्याची शक्यता आहे. विशेषतः आर्थिकदृष्टया सामान्य कुटुंबांना पाण्यासाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो.
जलवाहिनीचे काम महत्त्वाचे; पण नियोजनाचे काय?
कासच्या नवीन जलवाहिनीची जोडणी भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी महत्त्वाची असली, तरी सध्याच्या टंचाईच्या काळात पर्यायी नियोजन करणेही तितकेच आवश्यक आहे. शटडाऊनपूर्वी पुरेसा पाणीपुरवठा करणे, बाधित भागांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था करणे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याबाबत स्पष्ट माहिती देणे, या बाबींकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
एकीकडे पावसाची तूट आणि उपलब्ध जलसाठ्याबाबतची चिंता, तर दुसरीकडे शहरातील अपुरा व विस्कळीत पाणीपुरवठा, अशा दुहेरी संकटाचा सामना सातारा शहरातील नागरिकांना करावा लागत आहे. नवीन जलवाहिनीच्या कामामुळे भविष्यात दिलासा मिळण्याची अपेक्षा असली, तरी सध्या नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ थांबणार कधी, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





