पौड : बावधन वाहतूक पोलिसांच्या अनागोंदी कारभाराचा मुळशीतील घोटवडे फाटा येथे लाखो प्रवाशांना फटका बसला. शनिवार-रविवारी घोटवडे फाटा, पिरंगुट, भुगावला अतिशय वर्दळ असते. प्रचंड वाहतूक असूनदेखील येथे वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने ऐन गर्दीत रविवारी संध्याकाळी घोटवडे फाट्यावर चक्का जाम झाला. चारही दिशेला एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक प्रवाशी यामुळे त्रस्त झाले होते. मुळशी तालुक्यात शनिवार-रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. कोकण तसेच मुळशीत हजारो नव्हे तर लाखो पर्यटकही येत असतात. मात्र पर्यटकांना मुळशीतले रस्ते अपुरे पडत असून प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. स्थानिक नागरिकांना तर यादिवशी घराबाहेर पडणे मुश्किल होते. अशा परिस्थितीत घोटवडे फाटा, पिरंगुट, भुगाव येथे वाहतूक पोलीस व यंत्रणा उपलब्ध पाहिजे, ते असतील तर हळूहळू का होईना वाहतूक सुरळीत होत असते. मात्र रविवारी संध्याकाळी वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने घोटवडे फाट्याच्या मुख्य चौकात चारही बाजूने वाहने मनमानीपणे आणली गेली. त्यामुळे प्रचंड वाहतूक खोळंबा झाला. या प्रचंड वाहतूक खोळंब्यात बावधन पोलीस चौकीचे २ पोलीस आणि काही सुज्ञ नागरिक वाहतूक सुरळीत करत होते. मात्र वाहतूक पोलीस उपलब्ध नव्हते. या वाहतूक खोळंब्यात लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक व महिलांचे प्रचंड हाल झाले. अनेक नागरिकांनी पायी चालत जाणे पसंत केले. तर बस वाहतुकीत खोळंबल्याने बसने जाणाऱ्या अनेक प्रवाशांना बसची वाट पाहत बसावी लागल्याने दैना झाली. पोलिसांचे कार्यक्षेत्र बदलल्याने होतोय वाहतुकीला खोळंबा घोटवडे फाटा, पिरंगुट, भुकूम, भुगाव हे परिसर नुकतेच पौड पोलिसांच्या कार्यक्षेत्राच्या अखत्यारित्यातून काढून बावधन पोलिसांच्या कार्यकक्षेत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारित्यात राज्य शासनाने दिले आहे. मात्र यानंतरच या परिसरातील वाहतुकीला मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक काकुळतीला आले असून बावधन पोलिसांच्या कार्यकक्षेतून ते पुन्हा पौड पोलिसांच्या अखत्यारित्यात देण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.