वायनाडमध्ये भूस्खलनमुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी; 63 जणांचा मृतदेह तर…

Kerala News | केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात मंगळवारी सकाळी झालेल्या मोठ्या भूस्खलनानंतर आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शेकडो लोक अडकले असून, त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.
वायनाड जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी एका लहान मुलासह चार जणांचा जिल्ह्यातील चूरलमाला गावात मृत्यू झाला, तर नेपाळमधील एका कुटुंबातील एका वर्षाच्या मुलाचा थोंडरनाड गावात मृत्यू झाला. त्याशिवाय, पोथुकल गावाजवळील एका नदीच्या काठावरुन पाच वर्षांच्या मुलासह तीन मृतदेह सापडले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले .याव्यतिरिक्त, शेकडो अडकल्याची भीती आहे, परंतु अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केलेली नाही.
राज्याचे महसूल मंत्री के राजन म्हणाले की, भूस्खलनात जखमी झालेल्या ७० हून अधिक लोकांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत विजयन यांच्याशी फोन वरून चर्चा केली आणि केंद्राकडून राज्याला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. मेादींनी यातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला
मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा ही गावे भूस्खलनामुळे प्रभावित झाली असून त्या गावांचा संपर्क तुटला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.मंगळवारी पहाटे झालेल्या भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली, पावसामुळे अनेक जलस्त्रोत भरून वहात असून अनेक ठिकाणी पावसाची झाडे उन्मळून पडली आहेत.
वायनाडचे जिल्हाधिकारी मेघश्री डीआर म्हणाले की, बाधित भागात आपत्ती निवारण कार्य प्रगतीपथावर आहे आणि एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि वन, महसूल आणि स्थानिक स्वराज्य विभागांद्वारे बचाव कार्य केले जात आहे.सरकारी यंत्रणांसोबतच स्वयंसेवक आणि स्थानिक रहिवासी बचाव कार्यात सहकार्य करत आहेत, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
या भागातील करमंथोडू नदीवरील बाणासुरा सागर धरणाचे शटर उघडण्यात आले असून, सखल भागात राहणाऱ्यांना सावध राहण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. मुंडक्काई भागात अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्याची योजना आखली जात आहे. काही ठिकाणी मदतीसाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या आमच्याकडे भूस्खलनात बेपत्ता झालेल्या आणि मृतांची कोणतीही माहिती नाही. अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफचे जवान त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा:
Paris Olympics 2024 | मनु भाकरने पटकावले सलग दुसरे पदक; सरबजोतच्या साथीने रचला इतिहास





