गोरेगावमधील 31 मजली इमारतीमध्ये भीषण आग; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai fire | मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील कल्पतरू रेसिडेन्सी या 31 मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
प्रसंगावधान राखून येथील अनेक रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळीच इमारतीबाहेर काढण्यात आले. कल्पतरू या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर शनिवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मात्र या आगी मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आगीचे वृत्त समजताच इमारतीमध्ये एकच धावपळ सुरू झाली. अनेक रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी इमारतींबाहेर धाव घेतली. तर, अनेक लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी इमारतीच्या बाहेर सुखरूपपणे बाहेर काढल्याने ते थोडक्यात बचावले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.





