पुणे-दौंड मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; धुराचे लोट अन् प्रवाशांची पळापळ

पुणे : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर धावत्या डेमू ट्रेनमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळी 7:05 वाजता दौंड येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दौंड-पुणे डेमू ट्रेनच्या तिसऱ्या बोगीतील टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
आग आणि धुराच्या लोटांनी ट्रेनमधील प्रवासी घाबरले, आणि जीव वाचवण्यासाठी त्यांची पळापळ झाली. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये अडकल्याने त्याने केलेल्या आरडाओरडीमुळे इतर प्रवाशांनी दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
नेमकं काय घडलं?
दौंड-पुणे डेमू ट्रेन (Demultiple Unit) दररोज सकाळी 7:05 वाजता दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे रवाना होते. सोमवारी नेहमीप्रमाणे ही ट्रेन पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, दौंड आणि पुणे दरम्यानच्या मार्गावर, ट्रेनच्या इंजिनपासून तिसऱ्या बोगीतील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आग लागताच बोगीत धुराचे लोट पसरले, आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
प्रवाशांची पळापळ
आग आणि धुरामुळे प्रवासी घाबरले, आणि जीव वाचवण्यासाठी किंकाळ्या आणि आरडाओरड करत इकडे-तिकडे धावू लागले. काही प्रवाशांनी तातडीने ट्रेनच्या आपत्कालीन साखळी खेचून ट्रेन थांबवली.
दरम्यान, आग लागलेल्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकली होती. टॉयलेटचा दरवाजा लॉक झाल्याने तो उघडत नव्हता. या व्यक्तीने जोरजोरात आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले.
धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असतानाही काही धाडसी प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. ट्रेन थांबवताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, आणि काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले.





