पुण्यात टिव्हीएस सर्व्हिस सेंटरला भीषण आग; ६० दुचाकी खाक

पुणे – बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग येथील तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या टिव्हीएस कंपनीच्या शोरूम व सर्व्हिस सेंटरमध्ये सोमवारी (२५ ऑगस्ट) रात्री भीषण आग लागून तब्बल ६० दुचाकी जळून खाक झाल्या. रात्री ८.३८ वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच नायडू व येरवडा केंद्रातील अग्निशामक दलाची वाहने तसेच मुख्यालयाचा वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाला.
घटनास्थळी पोहोचल्यावर तळमजल्यावरील सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात पेटलेल्या वाहनांमुळे प्रचंड धूर पसरला होता. जवानांनी आत कोणी अडकल्याची खात्री करून, धुरामुळे अडकलेल्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर श्वसनयंत्र परिधान करून जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे अर्धा तास प्रयत्न केले. अखेर आग आटोक्यात आणून कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले.
या आगीत सर्व्हिस सेंटरमधील इलेक्ट्रिक व पेट्रोल वाहनांसह, वायरिंग, यंत्रसामग्री, बॅटऱ्या, सुटे भाग, संगणक, कार्यालयीन साहित्य यासह मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून, वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली. घटनास्थळी पोलिस व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.





