केरळच्या कासरगोडमध्ये भीषण स्फोट; 150 जण जखमी

तिरुअनंतपुरम : केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात सोमवारी रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान स्फोट झाला. यामध्ये दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. कासरगोड पोलिसांनी सांगितले की, 8 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वार्षिक कालियाट्टम उत्सवासाठी 1500 लोक मंदिरात जमले होते. याठिकाणी फटाके फोडले जात होते, त्यामुळे ठिणग्या फटाक्यांच्या स्टोरेज एरियापर्यंत पोहोचल्या, जिथे आगीमुळे स्फोट झाला. या साठवणुकीच्या ठिकाणी 25 हजार रुपये किमतीचे फटाके ठेवण्यात आले होते. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मंदिर समितीने फटाके व फटाके फोडण्याचा परवानाही घेतला नव्हता.
पोलिसांनी सांगितले की, जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन गंभीर लोकांना परियाराम वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर अनेकांना मंगळूर, कुन्नूर आणि कासारगोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कासारगोड जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
स्थानिक सीपीआय-एम आमदार एम. राजगोपाल यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे वर्णन केले. या घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. राजगोपाल म्हणाले- जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. फटाके कमी तीव्रतेचे होते, मात्र फटाक्यांच्या ठिणग्या ज्या ठिकाणी इतर फटाके ठेवल्या होत्या त्या ठिकाणी पडल्या. कासरगोडचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनीही जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली आहे.





