Pakistan Blast : पाकिस्तानातील मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 5 ठार, 20 जण जखमी

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका मशिदीमध्ये झालेल्या ताकदवान बॉम्बस्फोटात 5 जण ठार झाले आणि किमान 20 जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये जमियत उलेमा इस्लामच्या हक्कानी गटाचे प्रमुख आणि मदरसा-ए-हक्कानियाचे काळजीवाहक हमीदुल हक हक्कानी देखील ठार झाले. नौशेरा जिल्ह्यातल्या अकोरा खट्टक शहरातील मशिदीमद्ये हा स्फोट झाला, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारच्या प्रार्थनेच्यावेळी झालेला हा स्फोट आत्मघातकी बॉम्बस्फोट असल्याचा संशय आहे. हमीदुल हकना लक्ष्य करण्यासाठीच घडवून आणण्यात आला असल्याचे दिसून आले असल्याचे खैबर पख्तुनख्वा प्रांताचे पोलीस महानिरीक्षक झुल्फीकार हमीद यांनी सांगितले. दारुल उलूम हक्कानिया मदरसा सुन्नी इस्लामच्या हनाफी देवबंदी शाळेचा प्रचार करतो.
भारतातील दारुल उलूम देवबंद सेमिनरीच्या धर्तीवर मौलाना अब्दुल हक यांनी त्याची स्थापना केली होती, त्यांनी याच मदरशामध्ये शिकवले होते. माजी प्रमुख अख्तर मन्सूरसह तालिबानच्या अनेक प्रमुख सदस्यांनी येथे शिक्षण घेतले आहे. मदरशाच्या पद्धती आणि शिक्षणातील सामग्री तसेच माजी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील व्यवसायांमुळे त्याला जिहाद विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे.





