सामूहिक संसर्ग दोन महिन्यांपूर्वीच?

अद्याप शासकीय मोहर उमटण्याची प्रतीक्षा
“आयसीएमआर’च्या निकषांनुसार सामूहिक संसर्ग नाही : डॉ. आवटे
पुणे – “देशात करोनाचे सामूहिक संक्रमण दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. मात्र, त्यावर अद्याप शासकीय मोहर उमटली नाही,’ असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पण, “आयसीएमआर’च्या निकषांनुसार देशात अजून करोनाचा सामूहिक संसर्ग झाल्याचे निष्पन्न होत नाही. दावा करत राज्याचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचा दावा फेटाळला आहे.
“राज्यासह देशात करोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. मात्र, शासनाने त्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही,’ असे सांगत राज्याचे आयएमएचे राज्य अध्यक्ष अविनाश भोंडवे म्हणाले, “आपण सध्या स्टेज-3 मध्ये आहोत. परदेशातून आलेली व्यक्ती करोनाबाधित सापडणे ही पहिली स्टेज. त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होणे ही दुसरी स्टेज, तर ज्यावेळी संसर्ग कोणापासून झाला हे स्पष्ट होत नाही, ही स्टेज तिसरी असते. हीच परिस्थिती सध्या पुणे शहरासह राज्यात आहे.
देशात दररोज 30 हजारांवर करानोबाधित सापडत आहेत, तर अन्य देशातील तज्ज्ञांनी सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे मान्य केले आहे. परंतु केवळ आपले शासन हे मान्य करण्यास अजूनही तयार नाही. देशात भीतीचे वातावरण पसरू नये, यासाठी ते ही बाब जाहीर करत नसतील. मात्र, आता ग्रामीण भागांतही संसर्ग फोफावला आहे. त्यावर लॉकडाऊन या एकमेव पर्याय नाही. आता तर हा विषाणूची बाधा हवेतूनही होऊ शकते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन केले, तरच हा संसर्ग आटोक्यात आणू शकतो.’
“आयसीएमआर’ ही आपली शिखर संस्था आहे. एकूण करोना बाधित संख्येमध्ये 25 ते 30 टक्के बाधितांना संसर्ग कोठून झाला, हे ज्यावेळी स्पष्ट होत नाही त्यावेळी सामूहिक संसर्ग झाला म्हणता येईल. त्यामुळे याबाबतचे अधिकृत भाष्य “आयसीएमआर करणार आहे.’
– डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र





