MASAP Controversy: महाराष्ट्र साहित्य परिषदेत मोठा वाद उफाळला! प्रक्रियात्मक त्रुटींवरून आरोप-प्रत्यारोपांची राळ
MASAP Controversy: वार्षिक सर्वसाधारण सभेतील त्रुटींवरून सुरू झालेला वाद विकोपाला; प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कार्यवाह सुनील महाजन यांच्यात टोकाचे मतभेद.

MASAP Controversy- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनातील प्रक्रियात्मक त्रुटींवरून सुरू झालेला वाद आता आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. सभेच्या आयोजनाबाबत लेखी तक्रार करणारे मसापचे स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांच्यावर आता संस्थेची बदनामी केल्याचा आरोप करत प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी कारवाई का करू नये, असा सवाल केला आहे.
महाजन यांनी मात्र संस्थेचा कारभार घटनेनुसार चालण्यासाठी प्रश्न उपस्थित करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. मसापची वार्षिक सर्वसाधारण सभा १४ ऑक्टोबरला होती. सभेपूर्वी अंदाजपत्रक सभासदांसाठी उपलब्ध करून देणे, ताळेबंद आणि अन्य आर्थिक बाबी कार्यकारिणीत मांडून मंजूर करून घेणे यांसारख्या प्रक्रियांचे पालन झाले नसल्याचे आक्षेप उपस्थित झाले. या त्रुटींमुळे सभा पुढे ढकलण्यात आली.
यानंतर महाजन यांनी प्रमुख कार्यवाह डॉ. महाळंक यांना पत्र देऊन प्रक्रियात्मक त्रुटींवर आक्षेप नोंदवले. महाजन यांना उत्तर देताना महाळंक यांनी सभेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नसल्याने सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. या प्रक्रियेसाठी महाजन यांना स्वतंत्रपणे कळविणे किंवा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला बोलावणे बंधनकारक नसल्याचेही, त्या म्हणाल्या.
तसेच पत्रांवरील चुका सार्वजनिकरीत्या मांडण्यामागील महाजन यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत महाजन यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल केला. ऐतिहासिक शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या तीन महिन्यांवर आले असताना हा वाद चिघळल्याने संस्थेच्या प्रशासकीय कामकाजासह संमेलनाच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
“सत्य आणि नियमांनुसार बोलणाऱ्यांचा आवाज कारवाईच्या नावाखाली दाबणे ही स्पष्टपणे मुस्कटदाबी आहे! संस्था कोणाच्या मालकीची नसून सदस्यांची आहे; त्यामुळे त्रुटींवर पांघरूण घालण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, कारण अन्यायाविरुद्ध लढणे हाच एकमेव पर्याय आहे.”
– सुनील महाजन, कार्यवाह




