Tokyo Olympics : विजयी पंचसह मेरीकोम उपउपांत्यपूर्व फेरीत

टोकियो – ऑलिम्पिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची अव्वल खेळाडू मेरिकोम हिने विजयी पंच मारताना पहिल्या फेरीत अपेक्षेनुसार विजय प्राप्त केला. तिने पहिल्याच फेरीत डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेज हिला 4-1 असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली.
यंदाच्या स्पर्धेत पदकाची सर्वात जास्त अपेक्षा असलेल्या मेरीने या विजयासह अंतिम 16 खेळाडूंमध्ये प्रवेश मिळवला आहे. 6 वेळा जागतिक विजेती असलेल्या मेरीने हर्नांडेजला प्रतिकाराची संधीच दिली नाही.
मेरीची आगामी लढत गुरूवारी कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित वालेंसिया विक्टोरियाशी होणार आहे. मेरीने यंदा 51 किलो वजनी गटात सहभाग घेतला आहे.
मेरीने गेल्या वर्षी आशिया-ओसनिया पात्रता फेरीत उपांत्य लढत खेळताना टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. यंदा ती भारताच्या पथकाची ध्वजधारकही होती. मेरीची ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे सांगितले जात असून, यंदा पदक मिळवत कारकिर्दीची अखेर गोड करण्यासाठी ती सज्ज बनली आहे.





