Automobile Industry : मारुती सुझुकीने केली 30 लाख कारची निर्यात…

नवी दिल्ली – मारुती सुझुकी कंपनीने प्रवासी वाहन क्षेत्रात देशातील बाजारपेठेत मोठा बदल केला आहे. त्याचबरोबर या कंपनीने जगातील 100 देशांना कारची निर्यात केली आहे. निर्यातीचा आकडा आतापर्यंत तीस लाख कारवार गेला आहे. मारुती सुझुकी कंपनी लॅटीन अमेरिका, आफ्रिका, आशिया, मध्यपूर्वेतील देशांना जवळजवळ 17 मॉडेल निर्यात करते.
कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत कंपनीने वार्षिक पातळीवर निर्यात 17.4 टक्क्यांनी वाढवून 1,81,444 युनिट इतकी केली आहे. विशेष म्हणजे या सर्व कार मेक इन इंडिया आहेत आणि या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होण्यास मदत मिळत आहे. भारतातून जेवढ्या कार निर्यात होतात त्यापैकी 40% कार मारुती सुझुकी कंपनीच्या असतात.
कंपनीने दर्जा आणि कार्यक्षमता वाढविल्यामुळे परदेशातून कंपनीच्या वाहनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळातही आम्ही निर्यात जास्तीत जास्त प्रमाणात वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
Stock market : झोमॅटोच्या शेअरची आगेकूच, सेन्सेक्स निर्देशांकात समावेश झाल्याचा परिणाम…
कंपनीने 1986 मध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. 2012-13 मध्ये ही निर्यात दहा लाख कार पर्यंत पोहोचली. त्यानंतर 2012 -13 पर्यंत आणखी दहा लाख कार निर्यात करण्यात आल्या. दरम्यान भारतातील वाहनांची विक्री गेल्या काही महिन्यापासून मंदावली असल्याचे दिसून येते. भारतातील मध्यम वर्गाकडून खरेदी कमी होत असल्यामुळे कार विक्रीवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. व्याजदर कपात झाल्यानंतर ही विक्री पुन्हा वेगाने वाढू शकेल असे समजले जाते.





