Maruti Suzuki Price Hike : मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका; ‘या’ मॉडेल्सच्या किमतीत 20 हजारांपर्यंत वाढ
Maruti Suzuki Price Hike : मारुती सुझुकीने सप्टेंबर 2026 पासून निवडक कार मॉडेल्सच्या किमतीत 20 हजार रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. जाणून घ्या कोणत्या कार महागू शकतात.

Maruti Suzuki Price Hike : मारुती सुझुकीच्या कार खरेदीसाठी आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीने सप्टेंबर 2026 पासून आपल्या काही निवडक कार मॉडेल्सच्या किमतीत 20 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि महागाईमुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
मारुती सुझुकीने यापूर्वी मे आणि ऑगस्टमध्येही वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या. मात्र, त्या वेळी कंपनीच्या जवळपास संपूर्ण वाहन श्रेणीवर दरवाढ लागू झाली होती. सप्टेंबरमधील दरवाढ केवळ निवडक मॉडेल्सपुरती मर्यादित राहणार आहे.
कोणत्या कार महागणार?
नव्या दरवाढीचा नेमका परिणाम कोणत्या मॉडेल्सवर होणार, याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. मारुतीच्या प्रमुख मॉडेल्समध्ये ऑल्टो K10, एस-प्रेसो, सेलेरिओ, वॅगनआर, ईको, स्विफ्ट, डिझायर, ब्रेझा, अर्टिगा आणि व्हिक्टोरिस यांचा समावेश आहे.
नेक्सा श्रेणीमध्ये ई विटारा, इन्विक्टो, जिम्नी, XL6, ग्रँड विटारा, फ्रॉन्क्स आणि बलेनो या कार विकल्या जातात. यापैकी कोणत्या मॉडेलच्या किमतीत वाढ होणार, हे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
उत्पादन खर्चाचा कंपन्यांवर दबाव –
मारुती सुझुकीसोबतच टाटा मोटर्स आणि हुंडईनेही अलीकडे वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे कंपन्यांवर दबाव वाढला आहे.
ग्राहकांवर वाढत्या खर्चाचा परिणाम कमीत कमी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. खर्च कमी करण्यासोबतच स्थानिक पातळीवर अधिकाधिक सुटे भाग तयार करण्यावर कंपनीचा भर आहे.
नवीन बलेनो नुकतीच बाजारात –
मारुती सुझुकीने 5 सप्टेंबरला बलेनोचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.10 लाख रुपये आहे. या कारमध्ये स्विफ्ट आणि डिझायरमधील 1.2 लिटर Z-सिरीजचे तीन सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.
मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत फॅक्टरी-फिटेड CNG पर्यायही देण्यात आला आहे. नव्या बलेनोमध्ये मोठी फ्रंट ग्रिल, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि बदललेला बंपर देण्यात आला आहे. याशिवाय व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि लेव्हल-2 ADAS आधारित सुरक्षा सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.





