Marriage Issues – समाजात सध्या लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसमोर एक गंभीर संकट उभे ठाकले आहे. चांगली नोकरी, हक्काचे घर, गाडी आणि शेती असूनही अनेक तरुणांचे विवाह जुळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुली आणि त्यांच्या पालकांच्या वाढत्या भौतिक अपेक्षांमुळे अनेक तरुण आता चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, तरीही त्यांना अपेक्षित जोडीदार मिळेनासा झाला आहे. यामुळे मुलांच्या कुटुंबात चिंतेचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजकाल मुलींच्या पालकांकडून प्रामुख्याने सरकारी नोकरी असलेल्या मुलालाच प्राधान्य दिले जात आहे. मात्र, सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी असल्याने खासगी मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये मोठ्या पॅकेजवर काम करणाऱ्या मुलांनाही नाकारले जात आहे. खासगी नोकरीत शाश्वती नसल्याचे कारण पुढे केले जाते. तसेच, मुलाकडे भरपूर शेती असावी अशी अट असली तरी, लग्नानंतर मुलगी शेतात काम करणार नाही किंवा मुलाच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप नको, अशा अटीही घातल्या जात आहेत. वधू-वर सूचक मंडळांच्या संचालकांनुसार, आजकाल कुंडली किंवा कौटुंबिक संस्कारांपेक्षा भौतिक सुखाला अधिक महत्त्व दिले जात आहे. मुलाला स्वतःचा स्वतंत्र बंगला असावा, मोठे पॅकेज असावे आणि तो कुटुंबापासून वेगळा राहत असावा, अशा अपेक्षा सुशिक्षित मुलींकडून व्यक्त केल्या जात आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीला होणारा विरोध आणि शेतकरी मुलापेक्षा शिपायाला मुलगी देण्याची मानसिकता यामुळे ग्रामीण भागातील सदन शेतकऱ्यांची मुलेही लग्नाविना बसून आहेत. परिणामी, वधूच्या शोधात असलेल्या वरांचे आणि त्यांच्या पालकांचा मानसिक ताण प्रचंड वाढला आहे.