“लग्न तडजोड केल्याशिवाय टिकत नाही”; नेहा पेंडसेने केले वैवाहिक जीवनाविषयी भाष्य

मुंबई – अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नेहा सध्या लाखो दिलों की धडक बनली आहे. अभिनयासह नेहा तिच्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या वैवाहिक जीवनाविषयी भाष्य केले आहे.
नेहाने 2020 मध्ये शार्दुल सिंग बायस याच्यासोबत लग्न केले. तिच्या लग्नाचे फोटो त्यावेळी खूप व्हायरल झालेले. पण आता तिने आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी ती म्हणाली की, “लग्न हे कधीच गुलाबांच्या पाकळ्यांसारखं नसतं. कोणतंही लग्न तडजोड केल्याशिवाय टिकत नाही. बऱ्याचदा लग्नानंतर केवळ स्त्रियांनाच तडजोड करावी लागते. माझं लग्न झाल्यानंतरही मीच तडजोड करते. तो काही करत नाही.”
पुढे नेहा म्हणाली, “तुम्ही या तडजोडी तेव्हाच करु शकता, जेव्हा तुमचा समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. तुमचे त्याच्यावर प्रेम असते. तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री असते. जेव्हा तुम्हाला समतोल राखता येतो तेव्हाच एखाद्या स्त्रीला या गोष्टी फार सोप्या होतात. मग त्यावेळी स्त्रियांना तडजोड करणं फार सोपं होतं. ठिक आहे तो सांभाळून घेतो ना, ठिक आहे ना तो करतो ना, असं ठिक आहे, ठिक आहे म्हणतच आमचा साडेतीन वर्षांचा संसार अजूनही सुरु आहे.”
दरम्यान, नेहा आणि शार्दुलने 2020 मध्ये मोजक्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्न केले होते. शार्दुलचा दोनदा घटस्फोट झाला असून नेहासोबतचे त्याचे हे तिसरं लग्न आहे. त्याला दोन मुली देखील आहेत. तर नेहा पेंडसे मराठी बरोबरच हिंदीतील प्रसिद्ध ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमध्ये नेहा झळकली होती. यानंतर, ती 2018 मध्ये ‘बिग बॉस शो’ मध्ये दिसली होती.





