पुणे जिल्हा | कोरेगाव भीमात पुन्हा अल्पवयीन युवतीचा विवाह व अत्याचार

शिक्रापूर, (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथे पंधरा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन युवतीचा बालविवाह करुन युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली असताना पुन्हा नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विवाह करून युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युवतीच्या आई, वडिलांसह पती व सासूवर बालविवाहासह बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे नववीमध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन युवती सोशल मिडीयावर कोणत्यातरी युवकाशी बोलत असल्याचे तिच्या आई वडिलांच्या लक्षात आल्याने तिच्या आई वडिलांनी युवती अल्पवयीन असताना बळजबरीने राहत्या घरातून तिचे लग्न लावून दिले.
मात्र, त्यानंतर युवती अल्पवयीन असताना देखील तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. तर युवतीला कोणीही एकटे सोडत नसल्याने युवती याबाबत कोणासही काही बोलू शकत नव्हती.
तर नुकतेच युवतीचा पती कामाला तर तिचे सासू सासरे लग्नाला गेलेले असल्याचा फायदा घेत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिल्याने पोलिसांनी युवतीच्या आई वडिलांसह पती व सासूवर बालविवाह सह बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंके व पोलीस शिपाई नीरज पिसाळ हे करत आहेत.




