चंदीगड – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे चंदीगड, पंचकुला आणि मोहाली या भागात उच्च सतर्कता जाहीर करण्यात आली आहे. चंदीगड प्रशासनाने शहरातील सर्व बाजारपेठा व मॉल्स संध्याकाळी ७ नंतर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच फटाक्यांवर व आतिषबाजीवरही तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. पंचकुलामध्ये सायंकाळी ६ वाजता बाजारपेठा बंद ठेवण्यात येतील, तर मोहालीत रात्री ८ नंतर दुकाने उघडी ठेवण्यास बंदी असेल. केवळ औषधे व अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकाने याला अपवाद असतील. सध्या चंदीगडमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावी परतण्यास सुरुवात केली आहे. चंदीगड ISBT-43 बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापले हॉस्टेल्स रिकामे करत घरी निघण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ड्रोन अलर्टमुळे रात्रीच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. चंदीगड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (CTU) ने जम्मू आणि कटरा मार्गावरील बससेवा तत्काळ थांबवली आहे. चंदीगडचे जिल्हाधिकारी निशांत यादव यांनी आवश्यक वस्तूंच्या साठवणुकीवर बंदी घालत नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपल्याकडील साठ्याची माहिती अन्न व पुरवठा विभागाला द्यावी, असे आदेश दिले आहेत. महागड्या दराने वस्तू विकणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी ०१७२-२७०३९५६ हा क्रमांकही जारी करण्यात आला आहे. हे आदेश ९ मेपासून ७ जुलै २०२५ पर्यंत लागू राहतील, असे सांगणयात आले आहे.