Chandigarh Blast: पंजाब भाजप कार्यालयाबाहेर जोरदार स्फोट; शहरात हाय अलर्ट घोषित
Chandigarh Blast: पंजाब आणि चंदीगडमधील संवेदनशील राजकीय परिस्थिती पाहता, राजकीय पक्षाच्या मुख्य कार्यालयाबाहेर असा स्फोट होणे हे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान मानले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Chandigarh Blast: पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये बुधवारी संध्याकाळी खळबळजनक घटना घडली. सेक्टर ३७ मधील पंजाब भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) प्रदेश कार्यालयाबाहेर एका जोरदार स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संपूर्ण शहरात तातडीने ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास भाजप कार्यालयाचे कामकाज सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कूटीजवळ हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो दूरपर्यंत ऐकू आला. यामुळे परिसरात गोंधळ उडाला आणि लोक सुरक्षित ठिकाणी धावू लागले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या काही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी –
घटनेची माहिती मिळताच चंदीगडचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बॉम्ब शोधक पथकानेही तातडीने धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून नागरिकांना तिथून हटवण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि त्यात कोणत्या प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
शहरात कडक नाकाबंदी –
स्फोटाच्या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण चंदीगड शहरात हाय अलर्ट जाहीर केला आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये आणि येण्या-जाण्याच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक संशयास्पद व्यक्ती आणि वाहनाची झडती घेतली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
तपास सुरू: सीसीटीव्ही फुटेजची तपासणी –
पोलीस सध्या घटनास्थळावरील आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. स्फोटाच्या वेळी तिथे कोण उपस्थित होते किंवा कोणी संशयास्पद वस्तू तिथे ठेवली होती का, याचा शोध घेतला जात आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून माती, वाहनांचे तुकडे आणि रासायनिक अवशेष गोळा केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. गुप्तचर यंत्रणांनाही या तपासात सहभागी करून घेण्यात आले आहे.
भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया –
या घटनेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहराची शांतता बिघडवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कटामागे असलेल्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पंजाब आणि चंदीगडमधील संवेदनशील राजकीय परिस्थिती पाहता, राजकीय पक्षाच्या मुख्य कार्यालयाबाहेर असा स्फोट होणे हे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान मानले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.





