बारामती : केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात बाजार समिती आवारातील बाजार शनिवारी बंद

बारामती (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दि बारामती मर्चंट असोसिएशने केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी भारत बंदची आयोजन केले आहे.
दि बारामती मर्चंट असोसिएशन या बंदमध्ये सहभागी होणार असून शनिवार दि.( 16 )रोजी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारातील बाजार बंद ठेवणार असल्याचेअसोसिएशनचे अध्यक्ष अमोल शहा यांनी सांगितले आहे. पाच टक्के जीएसटी वाढीचा निर्णयशेतकरी व्यापारी व ग्राहकांच्या हिताचा नाही त्यामुळे हा निर्णय रद्द व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना निवेदन देण्यात आले आहे.
अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून ५ टक्के जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला आहे. सदरबाबतचे नोटीफिकेशन दि.( 13) जुलै रोजी काढले असून दि. (18 )जुलै पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा परिणाम आपल्या व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामध्ये अन्नधान्य, गुळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे.
दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी व्यापारी तसेच ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच अन्नधान्याला ५ टक्के जीएसटी सुरू केल्याने. शेतकरी व्यापारी व ग्राहक यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत फेरविचार करून अन्नधान्यावर जीएसटी रद्द व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी असोसिएशनचे माझी अध्यक्ष महावीर वडूजकर, बाळासाहेब फराटे तसेच उपाध्यक्ष निलेश भिंगे, चेअरमन सचिन सातव, सचिव निलेश दोशी, सहसचिव यश संघवी, खजिनदार तेजपाल दोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.




