Maharashtra cabinet meeting – मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी देखील मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० बेड्सचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागांच्या वतीने एकत्रितपणे घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मात्र, या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशिवायच ही बैठक घेण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या मंत्रीमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले. मागील बैठकीच्या वेळी शिंदे दिल्लीवारीसाठी, तर यावेळी मिठी नदीची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. याबरोबरीने कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड संस्थेस कोल्हापुरातील जमीन देण्यास मंजूरी देण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला-कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता देण्याचा निर्णय देखील मंजूर करण्यात आला. हे तिनही निर्णय महसुल, नोंदणी व मुद्रांक शुक्ल विभागाशी संबंधीत होते. तिनही निर्णयांवर मंगळवारी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. फडणवीसांकडून पावसाचा आढावा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. राज्यातील 12 ते 14 एकरावरील पीक बाधित झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असून जनावरांचेही नुकसान झाले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.