Flower Market : साडेतीन मुहूर्तांपैकी संपूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडवा गुरुवारी (दि. १९) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फूल बाजार चांगलाच फुलला आहे. फुलांना भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी शेतात राखून ठेवलेली फुले मंगळवारी (दि. १७) फूल बाजारात विक्रीसाठी पाठविली. बाजारात झेंडू, मोगरा, गुलछडी, शेवंती आदी फुलांना मागणीही चांगली राहिली. मागणीच्या तुलनेत आवक खूपच जास्त झाल्याने झेंडूच्या दरात रविवारच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर उर्वरित फुलांचे भाव स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गुढीपाडवा सणासाठी झेंडूला विशेष महत्त्व असते. यादिवशी नवीन वाहन तसेच घर खरेदी केल्यानंतर त्याची सजावट तसेच पूजा करताना झेंडू, शेवंती, गुलछडी या फुलाचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्या अनुषंगाने सोलापूर, बारामती तसेच पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून बाजारात आलेल्या कलकत्ता गोंडा, लाल व पिवळ्या रंगाच्या झेंडूने बाजार फुलल्याचे चित्र दिसून आले. सणासाठी झेंडूसह शेवंती, बिजली, गुलछडी, अॅष्टर, मोगरा, कागडा आदी फुलांना मोठी मागणी वाढली होती. त्याच्या खरेदीसाठी शहरातील खरेदीदार तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, आवकही त्याप्रमाणात झाल्याने रविवारच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांचे दर टिकून होते, अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. ‘गुढीपाडव्यामुळे फुलांची आवक वाढली आहे. शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातील खरेदीदारांनी खरेदीसाठी गर्दी करीत आहे. उद्या (बुधवार, दि.१८) मोठी आवक होण्याचा अंदाज आहे.’ – सागर भोसले, व्यापारी, मार्केट यार्ड ‘मागील वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्के आवक जास्त होत आहे. त्या तुलनेत गिऱ्हाईक कमी आहे. त्यामुळे फुलांना भाव कमी मिळत आहे. परिणामी, गुढीपाडव्याला भाव मिळेल, ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.’ – संतोष कुंभारकर, फूल विभागप्रमुख, पुणे बाजार समिती मार्केट यार्डातील दर्जानुसार फुलांचे दर झेंडू – १०-३० शेवंती – ६०-१२० गुलछडी – २००-५०० मोगरा – ४००-६०० Pune District : नागरिकांची गैरसोय, प्रशासनाचा भोंगळ कारभार; कोळवण-वाळेन मार्गावरील पूल पाडल्याने वाळेन व डोंगरगाव ग्रामस्थांची दैना