Vanchit-Congress: देशाचे सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाने २३ मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयासमोर मोठे धरणे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील फोर्ट परिसरातील ठाकरसी हाऊस येथे मंगळवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘भारत सरकार सेल आऊट झाले आहे’ — आंबेडकर बैठकीनंतर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली. “भारत सरकार एकंदरीत ‘सेल आऊट’ झालेले आहे. हा केवळ आर्थिक सेल आऊट नाही, तर देशाचे सार्वभौमत्वही गहाण ठेवण्यात आले आहे. आर्थिक बाजारपेठ सरेंडर करण्यात आली असून राजकीय निर्णय घेण्याची शक्तीही दुसऱ्यांच्या प्रभावाखाली गेली आहे,” असे ते म्हणाले. अमेरिकेच्या OFAC (ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल) या संस्थेने जारी केलेल्या ‘जनरल लायसन्स १३३’ अन्वये भारताला रशियाकडून केवळ ३० दिवसांसाठीच पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्याची परवानगी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत आंबेडकर म्हणाले की, यामुळे भारताची धोरणात्मक स्वायत्तता अमेरिकेकडे गहाण ठेवली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आरएसएसला जाब विचारणार – “अशा प्रकारच्या दबावाखाली असलेल्या व्यक्तीला तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदी कसे ठेवू शकता?” असा सवाल आरएसएसला विचारण्यासाठीच हे आंदोलन आयोजित केले जात असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी मध्यमवर्गीय नागरिकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. काँग्रेसचा पाठिंबा – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. “आदरणीय बाळासाहेबांनी मांडलेली भूमिका ही काळाची गरज आहे. या आंदोलनात काँग्रेस सक्रियपणे सहभागी होईल,” असे ते म्हणाले. मात्र त्यांनी मोदींवरील आरोपांबाबत ठोस पुरावे किंवा ठोस कारवाई अद्याप कोणत्याही विरोधी पक्षाकडून पुढे आलेली नसल्याचेही नमूद केले. दरम्यान, याआधी २ मार्च रोजी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने मोठे जनआंदोलन उभारले होते. आता नागपूर येथील आरएसएस मुख्यालयासमोरील आंदोलन हे या मालिकेतील पुढील मोठे राजकीय पाऊल मानले जात आहे. या बैठकीस आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सुदेश पटेल, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमिर अब्दुल काझी, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते व सुमित आनंद आदी उपस्थित होते.