Marathi Serial: 4 वर्षांच्या प्रवासानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा प्रेक्षकांना निरोप, शेवटच्या दिवशी कलाकार झाले भावुक

Sukh Mhanje Nakki Kay Asta Goes Off Air: छोट्या पडद्यावर सध्या जुन्या मालिका निरोप घेत आहेत, तर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपली. जवळपास 5 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता स्टार प्रवाहवरील 4 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.
डिसेंबर 2020 मध्ये ही मालिका सुरू झाली होती. 4 वर्ष आणि 1261 भाग पूर्ण केल्यानंतर आता मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. टीआरपीच्याबाबतीत ही मालिका नेहमीच आघाडीवर होती. मालिकेने टॉप-10 लोकप्रिय मालिकेतील आपले स्थान देखील कायम ठेवले होते. ही मालिका दोन भागांमध्ये प्रसारित करण्यात आली. यामध्ये गौरी-जयदीपची लव्हस्टोरी आणि शिर्के पाटील कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
शेवटच्या भागानंतर मालिकेतील सर्व कलाकारांनी केक कापत सेलिब्रेशन केले. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी निर्माते महेश कोठारे देखील उपस्थित होते. कोठारे व्हीजनद्वारे या मालिकेची निर्मिती करण्यात आली होती. या मालिकेत गिरीजा प्रभू, मंदार जाधव, वर्षा उसगांवकर, साईशा साळवी, अतिशा नाईक अशा अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
तसेच, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने निरोप घेतला असला तरीही चॅनेलवरील ‘आईबाबा रिटायर होत आहेत’, ‘तरीही तु ही रे माझा मितवा’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या तीन नवीम मालिका प्रेक्षकांचो मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत.





