Marathi Schools: मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात! पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांची होम टू होम धावपळ
Marathi Schools: जिल्हा परिषद शाळांच्या ढासळत्या स्थितीमुळे पालकांचा ओढा खाजगी शाळांकडे; शिक्षकांकडून पालकांची मनधरणी सुरू, मात्र शैक्षणिक दर्जात सुधारणेची पालकांची मागणी.

Marathi Schools – पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा ठरु लागला आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील घटत चालेली पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांची धावपळ उडत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याकडे पालकांच्या कल वाढला आहे. या मानसिकतेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत आहे.
या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मराठी शाळेच्या शिक्षकांना ‘होम टू होम’ जावे लागत असल्याचे चित्र सध्या संपूर्ण जिल्ह्यात पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये खाजगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्येमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र आहे. पटसंख्या कमी झाल्यामुळे अनेक शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि मराठी शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा त्यांच्यासमोर मांडण्यासाठी शिक्षक वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत आहेत. आमची शाळा का श्रेष्ठ आहे. हे पटवून देण्यासाठी शिक्षक होम टू होम जावून पालकांशी संवाद साधत आहेत. शाळांमध्ये राबविले जाणारे उपक्रम व यशाची माहिती देत आहेत. केवळ शाब्दिक आश्वासनावर न थांबता शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी सुविधांची अमिषे दाखवली जात आहेत.
यामध्ये प्रामुख्याने मोफत स्कूल व शाळेचा मोफत गणवेश, वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थी प्रवेशावर होईल, अशी आशा शिक्षकांना आहे.
पालकमांची मनधरणी करताना दमछाक
शाळांची सुरुवातीची तारीख 15 जून असली तरी शिक्षकांच्या कर्तव्याचा श्रीगणेशा 5 जूनपासूनच झाला आहे. पटसंख्या वाढवताना उन्हाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांचा प्रवेश आपल्या शाळेत हवा यासाठी पालकांची मनधरणी करताना शिक्षकांची दमछाक होत आहे.
सुसज्ज इमारती उभ्या करण्याची मागणी
सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांचा भौगोलिक दर्जा पूर्णपणे ढासळला असून शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण राज्यातील शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. स्पर्धेच्या युगात गुणवत्ता टिकवण्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्याचा अभाव यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा कल खाजगी व इंग्रजी शाळांकडे वाढला आहे. शासनाने मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत देऊन सुसज्ज इमारती उभ्या कराव्या अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर देण्याची गरज
पाल्यांच्या भविष्यासाठी इंग्रजी माध्यमांची निवड आम्ही करत आहोत. कारण आजच्या जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी ते आवश्यक आहे. केवळ मराठी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी घरी येऊन सोयी सुविधांचे अमिष दाखवण्यापेक्षा मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे.






