Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने होणार संमेलनाचा श्रीगणेशा; शाहू स्टेडियमवर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उद्या, गुरूवारी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात होत आहे.३३ वर्षांनंतर साताऱ्यात संमेलन होत असून त्यासाठी सारे सातारा सज्ज झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सातारा शाखा आणि मावळा फाउंडेशनतर्फे हे संमेलनन शाहू स्टेडियम येथे होत आहे.
संमेलनास येणारे साहित्यिक, रसिकांसाठी जिल्ह्याच्या हद्दीपासून महामार्गावर मार्गदर्शक फलक उभारले आहेत. शहराचे सुशोभिकरण केले असून प्रमुख रस्त्यावर साहित्य संमेलन, मावळा फाउंडेशन तसेच संमेलन संरक्षक संस्थेची बोधचिन्हे जागोजागी लावली आहेत. मध्यवर्ती भागातील १४ एकरातील भव्य स्टेडियमवर संमेलन होत असून येथेच १९९३ साली ६६ वे संमेलन झाले होते.
येथे मुख्य मंडपासह ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा यासाठी स्वतंत्र मंडप उभारले आहेत. इतर तीन सभागृहांमध्येही विविध साहित्यिक उपक्रम होतील.मुख्य मंडपाची आसनक्षमता दहा हजार असून ग्रंथप्रदर्शनासाठी नऊ फूट बाय नऊ फूट आकाराचे जर्मन हँगरचे २५४ गाळे उभारले आहेत. संमेलनाच्या मुख्य मंडपात ग्रंथदालनातूनच जावे लागणार आहे.
संमेलनस्थळ सातारा बसस्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असल्याने बाहेरून येणाऱ्या रसिकांना सहज पोहोचता येणार आहे. संमेलनस्थळाच्या पाठीमागील बाजूस वाहनतळाची व्यवस्था आहे.साहित्य प्रेमींसाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग उपलब्ध असून दोन रुग्णवाहिका संमेलनस्थळी कायमस्वरूपी असतील. संमेलनस्थळी २४ तास अग्निशमन दलाचे तीन बंब राहणार आहेत.





