Marathi Language : राज्यात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले असून, १ मे २०२६ पासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचा परवाना थेट रद्द केला जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. (Marathi Language) यापूर्वी हा निर्णय फक्त मीरा-भाईंदरपुरता मर्यादित असल्याची चर्चा होती. मात्र, आता हा नियम संपूर्ण राज्यातील सर्व रिक्षाचालकांसाठी लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १ मेपर्यंत तपासणी मोहीम राबवून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवरही सरकारने कारवाई करत Ola, Uber आणि Rapido यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी-अमराठी वाद वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. (Marathi Language) याशिवाय, ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई परिसरातील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने पॉड टॅक्सी प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबवला जाणार असून पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण केला जाणार आहे. तसेच, गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मेट्रो-१० प्रकल्पालाही वेग देण्यात येणार आहे. हा ९.७ किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग असून, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (Marathi Language)