मराठी उद्योजकांनी निर्यात क्षेत्रातील संधींचा फायदा घ्यावा – डॉ.धनंजय दातार

पुणे – भारताची निर्यात गेल्या दशकभरात विक्रमी वाढून ऐतिहासिक उच्चांकी पातळीला पोचली आहे. पुढील दशकातही हा वेग टिकून राहण्याची चिन्हे आहेत. भारतात व विशेषतः महाराष्ट्रात निर्यातीस अनुकूल अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत असून त्या संधींचा फायदा मराठी व्यावसायिक व उद्योजकांनी वेळीच घ्यावा, असे आवाहन दुबईस्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच येथे केले.
‘मिती ग्रुप’तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र बिझनेस एन्क्लेव्ह 2025’ परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. दातार म्हणाले, सरकारने निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. नवे परकी व्यापार धोरण अस्तित्वात आले आहे. उद्योग-व्यवसाय-व्यापार यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधांचा दहा वर्षांपूर्वी हाती घेतलेला विकास पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे वस्तू व सेवांची देशांतर्गत उलाढाल, तसेच परदेशांना निर्यात आगामी काळात अनेकपटींनी वाढणार आहे.
इंडिया-मिडल इस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसारखा (आयएमइइसी) प्रकल्प दशकभरात साकारला तर भारतातून युरोपला होणार्या निर्यातीचा कालावधी निम्मा होईल आणि खर्चही वाचेल. देशातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे तर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग प्रकल्पही पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. नवी मुंबई येथे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. नुकताच जाहीर झालेला वाढवण बंदर व आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक निर्यातीत अग्रेसर बनवणार आहे. हा सर्व विकास येत्या पाच-दहा वर्षांत फलदायी होणार असल्याने मराठी उद्योजकांनी निर्यातीच्या संधी साधायला हव्यात.





