निर्यात क्षेत्रात गुजरात आघाडीवर

नवी दिल्ली – सरलेल्या 2024-25 या वर्षात गुजरातमधून सर्वात जास्त निर्यात झाली आहे. देशातून झालेल्या एकूण निर्यातीत गुजरात राज्याचा वाटा सर्वात जास्त म्हणजे 26.6% म्हणजे 9.83 लाख कोटी रुपयाचा आहे.
सरलेल्या वर्षात भारतातील एकूणच निर्यातीवर नकारात्मक परिणाम झाला. तसाच गुजरात मधून झालेल्या निर्यातीवर झाला. मात्र देशातून एकूण झालेल्या निर्यातीत गुजरातने प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्र असून महाराष्ट्रातून सरलेल्या वर्षात 5.57 लाख कोटी रुपयांची निर्यात झाली. महाराष्ट्रातून झालेल्या निर्यातीपेक्षा गुजरातमधून झालेली निर्यात 4.3 लाख कोटी रुपयांनी जास्त आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन या संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार गुजरात आणि महाराष्ट्रानंतर निर्यातीत तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो.
भारतातून गेल्या वर्षी झालेल्या एकूण 37.02 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीपैकी उत्तर प्रदेशातून केवळ 1.86 लाख कोटी रुपयांची निर्यात झाली. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. एकूण निर्यातीत उत्तर प्रदेशाचा सध्याचा वाटा केवळ पाच टक्के असला तरी तो वेगाने वाढण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती झाली असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. उत्तर प्रदेशातून परंपरागत वस्तूबरोबरच आधुनिक वस्तूची निर्यात वाढले आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातून अमेरिकेला जास्त निर्यात होते.
जामनगरमुळे गुजरात पुढे –
गुजरातमध्ये जामनगर सह केवळ काही जिल्हे निर्यातीत जास्त योगदान करतात. जामनगरमधून गेल्या वर्षी 3.63 लाख कोटी रुपयाची निर्यात झाली. यामध्ये पेट्रोलियम पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय गुजरातमधून दागिने, सेंद्रिय रसायने, औषधी आणि अभियांत्रिकी वस्तूची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.





