Ashok Hande : ‘मराठी बाणा’ फेम अशोक हांडेंवर हल्ला; कार्यालयात घुसून आरोपीकडून मारहाण
Ashok Hande : पार्किंगच्या शुल्कावरून झालेल्या वादातून एका ५३ वर्षीय व्यक्तीने हांडे यांना बॅटने मारहाण केली.

Ashok Hande : ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आणि लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक अशोक हांडे यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत अशोक हांडे यांना दुखापत झाली आहे.
पार्किंगच्या शुल्कावरून झालेल्या वादातून एका ५३ वर्षीय व्यक्तीने हांडे यांना बॅटने मारहाण केली. या प्रकरणी माहीम पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, मारहाणीची घटना 1 मार्च रोजी घडली. अशोक हांडे हे मुंबईतील माटुंगा पश्चिमेकडील मनमाला टँक रोडवरील युनायटेड हाऊसच्या तळ मजल्यावरच्या कार्यालयात बसले होते.
याच परिसरात राहणारा आरोपी प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी हा त्यांच्या कार्यालयात बॅट घेऊन आला. सगळ्यात आधी त्यानं बॅटनं कार्यालयाच्या काचेवर प्रहार केला आणि आरोपी प्रथमेश उनफोडेनं ‘मराठी बाणा’च्या गाड्यांसाठी पार्किंगचे पैसे अशोक हांडेंकडे मागायला सुरुवात केली.
मात्र गाड्या ज्या ठिकाणी पार्क केल्या जातात, त्या जागेचा आणि संबंधित व्यक्तीचा कोणताही संबंध नसल्यानं अशोक हांडेंनी पैसे द्यायला नकार दिला. यावेळी मात्र आरोपीला राग अनावर झाला. आरोपीनं शिवीगाळ करत बॅटनं अशोक हांडेंवरच हल्ला केला.
हा सगळा प्रकार पाहून अशोक हांडेंच्या कार्यालयातील कर्मचारी मधे पडले आणि आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी अधिकच आक्रमक झाला. या घटनेची तात्काळ माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. Ashok Hande
आरोपीने पोलिसांसोबतही घातली हुज्जत
माहीम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र या आरोपीने पोलिसांशीही हुज्जत घालायला सुरुवात केली आणि त्यांना अपशब्दही वापरले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी प्रथमेश उनफोडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :






