छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांनी एकाच जिल्ह्यात उपोषण सुरू केल्याने जालन्यात वातावरण ढवळून निघालं. अशा स्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉक्टरांना काही मराठा आंदोलकांकडून तोंडाला काळं फासण्यात आले. डॉ. रमेश तारख असे त्यांचे नाव आहे. यानंतर डॉ. रमेश तारख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले डॉ. रमेश तारख ? मी नेहमी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. मराठा समाजसोबत आहे. फक्त गावात तेढ निर्माण होऊ नये यासाठी निवेदन दिले होते. त्याचाच राग धरून माझ्यासोबत अशी घटना घडली, अशी प्रतिक्रिया डॉ. रमेश तारख यांनी दिली आहे. का फासण्यात आले काळं? छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली. मनोज जरंगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध केल्यामुळे तोंडाला काळे फासल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. अर्ज दिलेल्या रमेश तारख यांना मराठा संघटनांनी काळे फासले. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. धक्कादायक म्हणजे आधी सत्कार केला आणि नंतर काळे फासले.