“मराठा आरक्षणाचे राजकारण केले जातेय”; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मत

पुणे – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, महाविकास आघाडीला ते न्यायालयात टिकविता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या विषयाचा आज राजकीय वापर सुरू आहे. मनोज जरांगे हे या आरक्षणावरून फडणवीसांच्या विरोधात बोलत असले, तरी त्यांचा राग हा व्यवस्थेविरोधात आहे, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात शनिवारी केला.
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार पेठ येथे पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राचे मीडिया सेंटर सुरू करण्यात आले. पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राज्य प्रभारी के. के. उपाध्याय उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते टिकवले. पण. उद्धव ठाकरे यांनाही ते आरक्षण टिकवता आले नाही.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल. काही जण जातीचा अजेंडा चालवला तरी लोक विकासाला मतदान करतील. महायुती सरकारने राज्यातल्या जनतेसाठी अनेक योजना सुरू करून त्यांना दिलासा दिला आहे. महाविकास आघाडी ही सरकारी योजना बंद करणारी आहे, अशी टीकाही मोहोळ यांनी यावेळी केली.





