Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी 17 वर्षीय मुलाने घेतले पेटवून; मदतीसाठी धावलेली आईही गंभीर भाजली

Maratha reservation – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या पाथरवाला गावात एका 17 वर्षीय मुलाने जाळून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत त्याला वाचवण्यासाठी धावलेली आईही गंभीर भाजली आहे. या दोघांनाही पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, जालन्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला गावात बुधवारी सकाळी ही घटना घडली. सुरेश गणेश जाधव असे जाळून घेणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने बुधवारी सकाळी अचानक मराठा आरक्षणासाठी जाळून घेतले. त्यात तो 50 टक्क्यांहून अधिक भाजला.
आपल्या मुलाने पेटवून घेतल्याचे पाहताच त्याची आई त्याला वाचवण्यासाठी धावली. त्यात त्या ही होरपळल्या. या दोघांवर जालन्यातील रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सूरज जाधव हा 17 वर्षीय युवक मागील 3 महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय होता.
आश्वासन देऊनही सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सूरज 12 वीनंतर आयटीआयचे शिक्षण घेत होता. गरिबीमुळे त्याला शिक्षणाची फिसही वेळेवर भरता येत नव्हती. आर्थिक परिस्थिती आणखी हलाखीची झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले,
असे सूरजची आई मंगलाबाई जाधव यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले तर त्याला सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही मंगलाबाई जाधव यांनी या प्रकरणी सरकारला दिला. दुसरीकडे, सूरजनेही सरकारने 3 महिने लोटले तरी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नसल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.





