मराठा आंदोलकांचा शिंदेंच्या कार्यक्रमाला फटका

हिंगोली – राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असून समाजाच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे.
कृपया शासन आपल्या दारी कार्यक्रमास लाभार्थ्यांची वाहतुक करण्यासाठी आणलेली बस परत न्यावी अशी विनंती करीत सकल मराठा समाजातील तरुणांनी रविवारी महामंडळ्यांच्या बसेस रिकाम्या पाठवल्या.
हिंगोलीत प्रशासनाकडून शासन आपल्या दारीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री उपस्थित राहिले.
त्यासाठी प्रशासनाचे अधिकारी मागील आठ दिवसांपासून दिवस रात्र एक करून कार्यक्रमाचे नियोजन करीत होते. त्यासाठी वेळोवेळी बैठकाही घेण्यात आल्या असून या कार्यक्रमास गर्दी दाखविण्यासाठी लाभार्थ्यांना आणले जात आहे.
त्यासाठी महामंडळाच्या ३०० बसेस तसेच खासगी ४०० वाहने घेण्यात आली आहेत. या शिवाय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चक्क गाव पातळीवर काम करणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्यांवर लाभार्थ्यांना आणण्याची सक्ती केली जात गेली जात होती.





