मनोज जरांगे पुन्हा आक्रमक ; हिंगोलीच्या ‘मराठा महाएल्गार संवाद रॅली’ची जय्यत तयारी

Maratha Mahaelgar samvad rally । मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. येत्या 6 जुलैपासून मराठवाड्यातील हिंगोलीतून त्यांच्या मराठा महाएल्गार संवाद रॅलीची सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मनोज जरांगे पाटील हे सभा घेऊन पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटवणार आहेत. त्यादृष्टीने हिंगोलीतील महाएल्गार संवाद रॅली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शहरात लागले तब्बल 200 भोंगे Maratha Mahaelgar samvad rally ।
हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या या संवाद रॅलीची जोरदार तयारी सुरु आहे. या संवाद रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव हिंगोली शहरात दाखल होणार आहेत. मुख्य शहरात सर्व ठिकाणी तब्बल 200 भोंगे लावले जाणार आहेत. शहरातील प्रत्येक चौकात आणि मोक्याच्या ठिकाणी हे भोंगे लावण्याचे काम आता सुरू करण्यात आले असून संवाद रॅलीसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांना सर्व सूचना आणि मनोज जरांगे यांचं भाषण चांगल्या पद्धतीने ऐकता यावे, यासाठी ही तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळते.
दोन लाख मराठा बांधव उपस्थित राहणार ?
हिंगोलीतील मराठा महाएल्गार संवाद रॅलीसाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या होत्या. 6 जुलैच्या रॅलीसाठी जास्तीत जास्त मराठा बांधव उपस्थित राहतील, यादृष्टीने जनजागृती करण्यात आली होती. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या मराठा महाएल्गार संवाद रॅलीमध्ये जवळपास दोन लाख मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्याची आठवण करण्यासाठी जरांगे यांच्याकडून महाएल्गार संवाद रॅली काढली जात आहे.
मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोन Maratha Mahaelgar samvad rally ।
मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम सध्या अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या घरी आहे. मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या या घराच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसून आले होते. स्वत: जरांगे पाटील यांनी गच्चीवर जाऊन हे ड्रोन्स पाहिले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याची शंका मराठा आंदोलकांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी जालन्यातली जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदनही दिले होते.





