पार्थच्या भूमिकेबाबत अजित पवार म्हणाले,’मला तेवढाच उद्योग नाही…’

मुंबई – मराठा आरक्षणासाठी बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आता मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यात अपयश आल्याची टीका राज्य सरकारवर होत असतानाच पार्थ यांनी ही भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांच्या ट्विटवरूनही अजित पवारांनी आज पत्रकारांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली की, ‘अलिकडची मुलं काय काय ट्वीट करतात. प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केले, तुमच्या मुलानं ते ट्वीट केले, मला तेवढाच उद्योग नाहीय. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तत्पूवी,पार्थ पवार यांनी विवेक रहाडेचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून हे ट्विट केले आहे. विवेकने आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही, असे पार्थ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.





