राज ठाकरेंच्या दौऱ्यात राडा; मराठा तरुणांची राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये घुसून घोषणाबाजी

धाराशिव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून करण्यात आली. दरम्यान, आज राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यामुळे या दौऱ्यात पहिल्याच दिवशी मोठा राडा पाहायला मिळाला.
काय घडले नेमके?
मनसे प्रमुख राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल परिसरात मराठा कार्यकर्ते घुसले असून गोंधळ घालत घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्येच ठिय्या मांडला आहे. सोलापूरमध्ये आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
‘महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
आंदोलकांनी घेतली आक्रमक भूमिका
जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. आता राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.





