satara | शिक्षण विभागाच्या आदेशाला अनेक शाळांचा कोलदांडा

सातारा, {संतोष पवार} – इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजण्यापूर्वी न भरवता नऊ नंतर भरवावेत अशी सूचना राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाचा तसा शासन निर्णय जारी केला.
मात्र राज्यात, जिल्ह्यात अनेक शाळांनी या आदेशाला कोलदांडा दिला आहे. अनेक शाळांच्या व्यवस्थापनाकडून या आदेशाचा भंग होत असून सकाळी नऊपूर्वी वर्ग भरवण्यास परवानगी घेतली नसेल तर अशा शाळांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचा पवित्रा सरकारने घेतला आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी एका कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या पहिल्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार राज्य शासनाने शासन निर्णय काढून शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ पासून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत सर्व शाळांना सुचना देण्यात आल्या होत्या.
राज्यात बहुतांश शाळांची सर्व वर्ग भरण्याची सकाळची वेळ ही ७.३० ते ८ अशी आहे. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी लवकर भरवल्यास लहान बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राज्याच्या राज्यपालांनी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्याबाबत सुचना केली होती.
या सूचनेचे प्रभावी अंमलबजावणी करत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय काढून सर्व शाळांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे फर्मान बजावले. या आदेशानुसार अनेक शाळांनी वेळापत्रकात बदल करुन तशी अंमलबजावणी केली.
मात्र अद्यापही अनेक शाळांच्या व्यवस्थापनाकडून या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी पालक व व्यवस्थापनामध्ये खटके उडत आहेत.
राज्यपालांची सूचना त्यानंतर राज्य सरकार शासन निर्णय काढते मात्र तरीही पूर्व प्रााथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी सात, साडेसात वाजता भरत आहेत.
वास्तविक शासनाच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी सर्व माध्यमांच्या शाळांनी करणे बंधनकारक असतानाही अनेक शाळा शासनाचा आदेश धुडकावून लावत असल्याचेच यावरुन दिसत आहे.
त्यामुळे अशा शाळांबाबत शिक्षण विभाग काय कारवाइ करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरण्याबाबत सूचना आहेत. ज्या शाळांना सकाळी नऊपूर्वी शाळा भरवायच्या आहेत त्यांनी तशी परवानगी शिक्षणाधिकाऱ्यांकडून घेणे आवश्यक आहे.
अशी परवानगी न घेता जर काही शाळा सकाळी नऊपूर्वी वर्ग भरवत असतील तर अशा शाळांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. शाळांनी नियमानुसार कार्यवाही अपेक्षित आहे. शरद गोसावी ( शिक्षण संचालक प्राथमिक)





