Satara | झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाला मिळणार बळकटी

सातारा, {संतोष पवार} – शिक्षण विभागानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला बळकटी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
ग्रामपंचायत विभागांतर्गत पाच वर्षांपासून रखडलेल्या ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पदोन्नत्या करण्यासाठी श्रीमती नागराजन यांनी पुढाकार घेत हा विषय मार्गी लावला.
ग्रामीण भागाचा गतीने विकास व्हावा, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी नागराजन यांनी प्रयत्न सुरु केल्याने आगामी काळात गावगाड्याचा कारभार आणखी गतीमान होण्यास मदत होणार आहे.
याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषदेचा पदभार स्विकारल्यापासून विविध विभागांच्या अडीअडचणी, प्रलंबित कामांची माहिती घेवून त्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता या विभागांवर त्यांचे विशेष लक्ष राहिले आहे. संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांनी चर्चा करुन अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी नागराजन यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीची एक दशकापासून प्रलंबित विषयही त्यांनी मार्गी लावला. समाजशास्त्र विषयाच्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सामोपचाराने मिटवण्यात त्यांना यश आले.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्या करुन अडचणीतील शिक्षकांना न्याय देण्याचे काम याशनी नागराजन यांनी केले. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या, नवीन शिक्षण सेवकांना समुपदेशाने नियुक्ती देऊन पारदर्शक प्रक्रिया याशनी नागराजन यांनी राबवली.
प्राथमिक शिक्षण विभागातील बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यानंतर याशनी नागराजन यांनी आपला मोर्चा ग्रामपंचायत विभागाकडे वळवला आहे.
ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवून ६२ ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी तर ९ ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली.
सुमारे पाच वर्षानंतर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने ग्रामसेवक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, अर्चना वाघमळे यांच्या गतीशील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
सध्या जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांमध्ये सरळ सेवा भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अनेक सवंर्गातील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होवून ते कामावरही रुजू झाले आहेत.
ग्रामपंचायत विभागात १०१ ग्रामसेवकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्पयात असून ही प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी याशनी नागराजन यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायत विभागात १०१ नवीन ग्रामसेवक रुजू झाल्यानंतर या विभागातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
सध्य परिस्थितीत एका ग्रामसेवकांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण जाणवत आहे.
अशा परिस्थितीत पदोन्नती व भरती प्रक्रिया गतीने होण्यासाठी याशनी नागराजन यांनी पुढाकार घेतल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
क़ामाचा ताण कमी झाल्यास त्याचा चांगला परिणाम आगामी काळात दिसण्यास मदत होणार असून गावगाड्याचा कारभार आणखी गतीमान होण्यास मदतच होणार आहे.
ग्रामीण भागाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पावले उचलण्यात येत आहेत. ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
गावगाड्याचा कारभार आणखी गतीने होण्यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात येत आहेत. ग्रामीण भागात मुलभूत सोयी सुविधा पुरवण्यावर प्रशासनाचा भर आहे. – याशनी नागराजन (मुख्य कार्यकारी अधिकारी)





