“राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा” ; काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, दिले निवेदन

Congress meets Governor। देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यातल्या सरकारकडे विरोधकांनी आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसत आहे. कारण विरोधी पक्षाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे. यासाठी विरोधकांनी राज्यपालांची विनंती केली आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील निवेदन राज्यपालांना सादर केले. या निवेदनात एकीकडे राज्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून दुसरीकडे जनता दुष्काळात होरपळून निघत आहे. मात्र, तरीही शिंदे सरकारला यापरिस्थितीचं गांभीर्य नाही. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती बघता शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केलीय.
शिंदे सरकारला परिस्थितीचे गांभीर्य नाही Congress meets Governor।
या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी,“लोकसभा निडणुकीच्या काळात राज्यांत २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अद्यापही आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी खते, बियाणे, औषधे अद्यापही देण्यात आली नाहीत. मात्र, शिंदे सरकार याकडे लक्ष्य द्यायला तयार नाही. त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
“दुष्काळ असताना सरकारचे मंत्री सुट्टीवर कसे?” Congress meets Governor।
पुढे बोलताना त्यांनी “टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आलं. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकार मंत्री सुट्टीवर गेले. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे या मंत्र्यांनी परदेशात जाण्याआधी कोणाची परवानगी घेतली होती, याचा खुलासा झाला पाहिजे”, असे ते म्हणाले.
“राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवा”
त्यासोबतच “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. मात्र, या मोदी सरकारने संसद परिसरातून या महारपुरुषांची पुतळे काढले आहेत. त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून याबाबत राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवा”, अशी मागणी केल्याचंही नाना पटोले यांनी सांगितले.





